January 18, 2025

पेशवाईतीलभोजनव्यवस्थेचा_थाटमाट …

आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन “पेशवाई थाट” असा सहज करतो. पण प्रत्यक्षात “पेशवाई थाट” एवढा सोपा नव्हता! कसा होता “पेशवाई थाट”?

🍲🍛🥥🍎🍇#पेशवाईतीलभोजनव्यवस्थेचा_थाटमाट …

पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात . लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत . नित्य , नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात . 
पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत . त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात , कागदासारख्या पातळ पाटवड्या , पुरणपोळ्या , रंगीबेरंगी मिठाया , भाज्या , चटण्या , कोशिंबिरी , केळीच्या पानावर वाढल्या जात . पानाच्या बाजूला द्रोणात दूध , तूप ,ताक , दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे . पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत . दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत .

सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली . पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ , मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या , कोशिंबिरी , लोणची , पापड , भजी , कुरडया व खीर पुरण असे . मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या , आमट्या , सार , सांबार , व पक्वान्ने , पानाच्या मध्यभागी पोळ्या , पुऱ्या व भाताचे प्रकार . ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे .

ब्राम्हण भोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान , दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण , पानाभोवती रांगोळ्या , बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट , चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान् खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी ) , पानात १० भाज्या त्यात तोंडली , परवरे ( पडवळ ) , वांगी या भाज्या नित्य असत . तुरीचे वरण , २ प्रकारची सांबारे , आमटी , १० प्रकारची लोणची ( त्यातील एक साखरेचे गोड ) असे . ३-४ प्रकारच्या फेण्या , साधे वडे , वाटल्या डाळीचे कढीवडे , साजूक तूप , माध्यम गोड मठ्ठा , २ प्रकारच्या खिरी ( शेवयाची व गवल्याची ) , सपिठाच्या पूर्ण पोळ्या ( पुरण पोळ्या ) , खिचडी , ओले हरभरे , पापड , सांडगे , चिकवड्या , मिरगोंडे ( मिरगुंडे ) , फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या , २० प्रकारच्या कोशिंबिरी , फळभाज्या , पालेभाज्या , उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड , तळवडे , पंचामृत , रायती , ताकाची कढी , चाकवताचे सांबार , मसालेदार वांगी , सुरण , पांढरा भोपळा ,मेथी किंवा आंबाडीची भाजी , चटण्या , कोशिंबिरीत कोथिंबीर लसण  , आले , लाल मिरच्या , तीळ , जवस , कारले , आमसुले , हरभऱ्याची डाळ , लिंबे याचा वापर करीत . तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे . घीवर , आमरस , श्रीखंड ( हे पक्वान्न शे बाजीराव ( दुसरे ) यांनी प्रचारात आणले . बासुंदी , केशरी साखरभात , जिलेबी ( हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले .) लाडू , पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते .) भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी  विडा दिला जाई . ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती .)

पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हण भोजनाचा मक्ता ६९०० रु चा असे . त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत . यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे . सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता . तसेच नेवैद्य व थोरले पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता . या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणे प्रमाणे भोजनखर्च होत असे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *