October 5, 2024

गुढी पाडवा

हिंदू दिनदर्शिकेत गुढी पाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढी पाडवा हा एक भारतीय हिंदू सण असून त्या दिवसा पासून मराठी नूतनवर्ष आरंभ होतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो . चला तर आज जाणून घेऊया गुढी पाडवा का आणि कसा साजरा करतात? कोणती कथा आणि इतिहास दडलेला आहे या मागे……..

उत्सवाचे स्वरूप –


गुढी पाडवा हा मराठी नूतनवर्ष म्हणून साजरा करण्यात येतो ; त्यामुळे या दिवशी दाराला आंब्यांच्या पानाचे तोरणे लावून दारी गुढी उभारतात. घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. घरातील वडीधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन नववर्ष शुभेच्छा दिल्या जातात.


या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. गुढीपाडव्यापासून रामजन्मोत्सव कार्यक्रम प्रारंभ होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून ‘संवत्सर पाडवो’ वा ‘उगादी’अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.सिंधी लोक ‘चेटीचांद’ नावाने या उत्सवाला संबोधतात. सिंधी नववर्ष म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

शालिवाहन शकास सुरुवात –


शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.

सांस्कृतिक इतिहास –

: ब्रम्हदेवाने केली विश्वनिर्मिती –

  • ब्रह्मदेवाने पहिल्यांदा सृष्टी निर्माण हयाच पवित्र दिवसी केली . ब्रम्हदेवाने ‘विश्वनिर्मिती’ केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातील तेज-तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो अशी मान्यता आहे.

: विष्णू मत्स अवतार –


चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म झाला. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून ‘शंकासुराचा’ वध केला,शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की “माझ्या कलेस तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावं” भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

: श्रीराम विजयध्वज प्रतीक –


चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, आणि जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वजा उभारुन मोठ्या आनंदाने केले. म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा दिवस म्हणून साजरा करतात. प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वनवासाच्या काळात सीता मातेच्या शोधत निघाले असताना सुग्रीव राजाला त्यांचे राज्य परत मिळवून देण्यासाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. वालीच्या आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.

महाभारतात गुढी पाडव्याच्या उल्लेख –


महाभारतात देखील गुढी पडवा साजरिकरणाचा उल्लेख आढळतो असे मानले जाते. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.

गुढी शब्दाची उकल-


तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे. तर हिंदीत गुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी हा शब्द अधिक प्रचारीत आहे.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व –


गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या मध्ये घरोघरी गुढ्या उभारल्या जातात . त्या मध्ये वापरली जाणारी कडुलिंबाच्या पाना पासून बनवला जाणारा प्रसाद सगळ्यांचं दिला जातो .तो आरोग्यदृष्ट्या अत्यंत उत्तम असतो खर तर प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. त्याने आपली पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, अश्या अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तसेच धान्यातील कीड थांबवणे असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. कडुलिंबाच्या पानांनी स्नान केल्यास शरीराला थंडावा मिळतो त्या करता कडुलिंब आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

गुढीचा साहित्यिक संदर्भ-


संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष – इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात “टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥” १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. ‘संत एकनाथांना’ या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.

१६व्या शतकातील “विष्णूदास नामा” यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख ‘गुढीयेसी’ असा होताना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते,[१८] तो अभंग असा”
आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ।।
मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ।।
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णूदास नामा गुढीयेसी ||…..

सामाजिक महत्त्व –


ज्या प्रमाणे दिवाळी पहाट मध्ये सांस्कृतिक मैफिली आयोजित केल्या जातात आता त्याच प्रमाणे रसिकांचं वाढता प्रतिसाद पाहून नववर्ष पहाट देखील गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित केली जाते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होतात.
डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

विविध नावे –


चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण भारतात वेगळे वेगळे सण साजरे होतात ; त्या सगळ्यांची विगत वर नावे खालील प्रमाणे

  • महाराष्ट्र( मराठी) – गुढीपाडवा
  • पारशी – नवरेह
  • सिंधी – चेतीचांद
  • गुजरात – चैत्र नवरात्री आरंभ
  • आंध्र प्रदेश – उगाडी
  • कर्नाटक – संवत्सर पाडवा

गुढीपाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीला जपणारा सण आहे , या बद्दल अनेक अशी सांस्कृतिक परंपरा, माहिती आणि कथाचा संबंध जोडला जातो .आपल्या परंपरा जपण आणि पुढील पिठीला त्याबद्दल सविस्तर माहिती करून देणं हे आपल्याच हातात आहे. त्या करता आपले पारंपरिक सण उत्सव आपण साजरे करूया आणि आपल्या पुढील पिढीला जागरूक करूया.

तुम्हाला हा आमचा ‘गुढीपाडवा ‘ या सणनिमित्त प्रस्तुत केलेला महितीपूर्वक लेख कसा वाटला हे कॉमेंट्स करून नक्की कळवा.

लेखिका
स्वाती बोरसे ,
वडोदरा, गुजरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *