March 5, 2025

मनोजुळणी

🌹 मनोजुळणी ~

हेमंत आणि हर्षिता
उभयता आत येताच..

“”लेकीचे लग्न ठरवून आलो.हेमंत आनंदाने म्हणाला..

“‘सर्वात आधी तुम्हाला सांगायला आणि नमस्कार करायला आलो.”‘

हर्षिता म्हणाली—

“‘काकू, मला माहीत नव्हते तुम्ही मंगलाष्टक करता ते.मला आईने सांगितले.उन्नती काकू देतील लिहून… चाल पण लावून देतील.त्यांचेवर सोपव बिनधास्त.

मग आता मंगलाष्टक करणे,उखाणे आणि घाण्याची गाणी आणि विहिण ,लिहून देणे हे आता तुमच्याकडे हं!!!नाही म्हणू नका pl.

हेमंत म्हणाला…
“‘ घाण्याची गाणी, विहिण लिहून द्या.हे काय असते बुवा?आपल्या लग्नात तर मला हे काहीच आठवत नाही””

हर्षिताने भूतकाळ उगाळला..
“‘आपलं लग्न तुझ्या घरच्यांना मान्यच नव्हतं.नुसता माझा रागराग करत होत्या सासूबाई..'”😢

विषयाची गाडी दुखदअंधाऱ्या बोगद्यातून जाते बघून मूळ..शुभ -सुखद रुळावर आणत मी म्हणाले…

” शुssक!!!
तो विषय नकोच.सांगा..

लेकीचे लग्न कधी?जावई काय करतो?घरात कोण कोण आहे?
सर्व सांगा.

ऐकता ऐकता मी दुधाला नेसकँफे लावून आणते. ….तोवर चिवडा,बिस्किटे घ्या.
ते दोघे आनंदातिशयाने
होणाऱ्या जावयाचे..घराचे..माणसांचे कौतुक करत होते.
काँफी घेऊन ते निघताना
परत..
”मंगलाष्टके करा हं.उखाणे हटके हवेत हं”‘😊

आठवण करून गेले.


माझे मन एकदम बत्तीस वर्षे मागे हेमंतच्या घरात गेले—
हेमंत व वनश्री(तिचे माहेरचे नाव)चे प्रेम होते. पण हेमंतच्या आईचा हेका .. पत्रिका जुळली तरच विवाह करा.
नेमके कुणी ज्योतिषाने सांगितले..

“‘ह्या मुलीच्या पत्रिकेत विवाह झाला कि वर्षभरात वैधव्य आहे. ”😢

अर्थातच हेमंतच्या आईचा विवाहास विऱोध होता.सून म्हणून ती मुलगी तिच्या ड़ोळ्यासमोर सुद्धा नकोच होती.


वनश्री सुद्धा हेमंतला टाळायला लागली..
“‘नको.मी अपशकुनी आहे. माझी सावली सुद्धा त़ुझ्यावर नकोच. हेमंत तू दुसऱ्या मुलीशी लग्न कर. सुखी रहा.मी लग्न करणार नाही.”‘😢

हेमंत वेडापिसा झाला. मी तुझ्या विना राहू शकत नाही .माझा पत्रिकेवर विश्वास नाही. जे व्हायचे ते होईल. मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार.””💐

ते दोघे आमच्या घरी मनोगती मासिक घेऊन आले.☺️

32 वर्षांपूर्वी तेव्हा.. मी त्या मासिकात एक कथा लिहिली होती.. त्यात–

💐विवाहात मनोजुळणी महत्त्वाची आहे.💐
हे वाक्य होते.

हेमंतने आगतिकतेने मला ते दाखवले.आम्हा उभयतांना खूप हासू आले.
मी त्याला म्हणाले..

“‘अरे ती कथा आहे.
येथे तुझ्या जीवाचा प्रश्न आहे.”‘♥️

तो निकराने म्हणाला…

“‘ वनश्री माझ्या जीवनात गेली चार वर्षे आहेच.उलट मी तिच्या सहवासात जास्त बहरलो करीअर उत्तम हवेच.हे लक्षात आले. प्रयत्न केले.यश मिळत गेले.

वनश्री रडकुंडीला आली..

“हेमंत ऐकतच नाही.उलट जास्तीत जास्त माझ्यात गुंतत चालला आहे.आता तर राजरोसपणे माझ्या घरात येतो.स्वप्ने रंगवतो.माझ्या आईबाबांना पण काही समजत नाही –काय करावे?

मी गप्पच बसले.
माझ्या पतीने मात्र जोरात सांगितले…

“‘हेमंत,पत्रिकेवर माझा पण विश्वास नाही. त्या काळात आमचे लग्न पत्रिका न बघता झाले आहे. घरातील सर्वांना उन्नती पसंत होतीच.उन्नतीच्या लहानपणापासूनच तिला सर्व जण बघत होते.

मग..पत्रिका कशाला बघायची.. हे मत माझ्या द्विपदवीधर वडिलांनी मांडले.माझे काय वाईट झाले?छान चालू आहे.💐

त्यावर मी म्हणाले..
” तरीही तुम्ही दोघे मिळून खूप खूप विचार करून निर्णय घ्यावा.
जन्म आणि मृत्यू अटळ आहे. कसा?कधी?कुठे?केव्हा?हे अजून तरी आपल्या हातात नाही. पण कुणावर ठेपर ठेवून त्या व्यक्तीचा धि:कार करणे.मला पटत नाही. तुम्ही ठरवा काय ते..पण निर्मळ मैत्र ठेवा…”

घरच्यांच्या विरोधात .. सासूच्या जळफळात.. त्या प्रेमी युग्माचे लग्न झाले.संसार छान चालू आहे.दोन गोजिरी मुले झाली.


आज तेच हेमंत आणि हर्षिता.. त्यांच्या लेकीच्या विवाहाची गोड बातमी सांगत होते.
“”मंगलाष्टके करा हं..””

आवाज कानात घुमत होता.मी कोऱ्या कागदावर श्री लिहून देवासमोर तो कागद ठेवून ..गणरायाला विनविले..

मंगलाष्टक मधून अक्षतांरूपे हजारो आशीर्वाद त्यांच्या लेकीला-जावयाला मिळतीलच.

पण.. आमच्या..
हेमंत-हर्षिता जोडीची
मनोजुळणी शतायु होवो. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *