श्रावण हा संपूर्ण महिना व्रतांनी आणि सण उत्सवांनी परिपूर्ण आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे. पहिला श्रावण सोमवार, पहिली मंगळागौर, नागपंचमी यानंतर श्रावण षष्ठी आणि श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमी येते. श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमीला शीतला सप्तमी किंवा शिळासप्तमी असे म्हणतात. हा सण सर्वांकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.
शीतला सप्तमीच्या अनेक कथा आहेत परंतु एका कथेनुसार, शीतला सप्तमी भाजली गेली होती तेव्हापासून तिला सर्व शीतल म्हणजेच थंड करून दिलं जातं, अर्थात चूल पेटवत नाही कारण या दिवशी शीतला माता चुलीजवळ वावरत असते, अशी समजूत आहे.
जाणून घ्या शीतला सप्तमीची कथा
आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याने एक गाव वसवलं गावाजवळ तळे बांधले, पण त्या तळ्याला काही केल्या पाणी लागेना, जलदेवतेची प्रार्थना केली,जलदेवता प्रसन्न झाली, आणि म्हणाली राजा राजा तुझ्या सुनेचा मुलगा बळी दे पाणी लागेल, हे राजाने ऐकले,घरी आला. मनी विचार केला, फार दु:खी झाला. नंतर विचार केला पुष्कळ लोकांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडेल कशी, सूनेला कसे समजवावे. त्याने एक युक्ती केली. तोड काढली. सूनेला माहेरी पाठवलं. मुलाला आपल्याकडे ठेऊन घेतलं. सासऱ्याने आज्ञा केली सून माहेरी गेली. इकडे राजाने चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातले. जेवू घातले, दागदागिने अंगावर चढवले. एका पलंगावर निजवलं. तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला भरपूर पाणी लागले.
पुढे राजाची सून माहेराहून भावाला बरोबर घेऊन येऊ लागली. मामंजीने बांधलेले तळे आले. तळे पाण्याने भरलेले पाहिले. तिथे तिला श्रावण शुध्द सप्तमी लागली, वशाची आठवण झाली. तो वसा काय ? तळ्यात जावे, पूजा करावी, काकडीचे पान घ्यावे दहीभात घालावे, लोणचे घालावे, एक सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतेची प्रार्थना करावी. जय देवी आमचे वंशज पाण्यात बुडाले असेल तर ते आम्हाला मिळोत. अशी प्रार्थना केल्यावर तळ्यात बळी दिलेला मुलगा पाय खेचू लागला, पाय कोण ओढतं हे पाहू लागली तर तोच तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिने कडेवर घेतला आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळले. सून मुलाला घेऊन आली राजालाही आश्चर्य वाटले. त्याने सूनेचे पाय धरले घडला वृत्तांत सांगितला, तो परत कसा मिळाला विचारणा केली. सूनेने घडली हकीकत सांगितली. शिळासप्तमीचा वसा केला तळ्यात वाण दिले जलदेवतेची प्रार्थना केली मून पुढे आलं. मुलाला कडेवर उचलून घरी आणलं. राजाला फार आनंद झाला, तिजवर आणखी ममता करू लागला. जसा तिला जलदेवता प्राप्त झाल्या तसा तुम्हांस आम्हांस होवोत. ही कहाणी सफळ संपूर्ण.
या दिवशी काय करतात?
घरातील चूल, शेगडी, आधुनिक युगात गॅस, स्टोव्ह व इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात. या दिवशी शीतला देवीची पूजा करतात. षष्टीच्या दिवशी खाद्य पदार्थ तयार करून ठेवले जातात आणि सप्तमीला या पदार्थांचे नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी जलाशयांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. या पूजेने मुलांना आजार होत नाही आणि त्यांच्यावरील संकट दूर होतात, अशी धारणा आहे.