October 5, 2024

उन्हाळ्यात शरीरास उपयुक्त पेय

उन्हाळ्यात पुरेशा विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. वर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर कामे. या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेशा विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत आपले शरीर काम करत असते. शरीर देखील थकते. अशा वेळी गरज भासते ऊर्जा देणाऱ्या पेयांची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नैसर्गिक ऊर्जा देणारी पेय घेणे ‍कधीही चांगले. अशा पेयांबद्दल जाणून घेऊ या.

लिंबू पाणी

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आणि शरीरास नवी ऊर्जा देते.

या उन्हाळ्यात थंडगार लिंबू शिकंजी हे पेय नक्कीच ट्राय करा. लिंबाचा रस, पुदिना, सोडा वॉटर, जिरे, काळे मीठ, धने पावडर टाकून तुम्ही शिकंजी तयार करु शकता.तयार झालेल्या शिकंजीवर तुम्ही बर्फाचे तुकडे आणि पातळ लिंबाचे गोल काप करुन टाका. त्यानंतर अजून बर्फाचे तुकडे टाकून त्यावर पुदिन्याची पाने टाका.

शहाळ्याचे पाणी

शहाळे किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमतरता पूर्ण करून शरीरास शक्ती देते. यामध्ये नैसर्गिकरीत्या असलेले पोटॅशियम पाण्याची कमी होऊ देत नाही.
नारळ पाणी हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे. उन्हाळ्यात याचे नियमित सेवन करावे. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे किडनी स्टोन रोखण्यास मदत होते. तसेतर बाराही महिने नारळाच्या पाण्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपले त्वचा चांगली होण्यासही मदत होते.

ताक

उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
ताक म्हणा किंवा मठ्ठा दोन्हींचेही अनेक आरोग्य फायदे आहेत. ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. हे आतड्यासाठी खूप चांगले आहे. हिंग, चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि दही वापरून बनवले जाते. हे एक अतिशय चवदार पेय आहे. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आणि फायदेशीर आहे

उसाचा रस

उसाचा रस हे उन्हाळ्यात उपलब्द झालेले आणखी एक शीतपेय. उसाचा रस सर्वांनीच प्रिय असतो, पण उन्हाळ्यात बर्फ घालून उसाचा रस पिणे टाळा. उसाच्या रसात पाण्याचे प्रमाण जास्त असू नये. कफ आणि दम्याचा त्रास असणाऱ्यांनी मात्र उसाचा रस घेणे टाळावे.

ग्रीन टी

हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते अाणि शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच ऊर्जा मिळते. व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल.

दूध

लहानपणापासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. दुधात अधिकाधिक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे हा संपूर्ण आहार मानला गेला आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे

जलजीरा

उन्हाळ्यात जलजीरा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जलजीरा हे जिरे, आले, काळी मिरी, पुदिना आणि वाळलेल्या कैरीची पावडर वापरून बनवले जाते. या मसाल्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ते मळमळ, सूज आणि अपचन दूर करण्यासाठी कार्य करतात. त्यात पुदिन्याची पाने टाकल्याने उन्हाळ्यातही थंडावा मिळतो.

कैरीचे पन्हे

उन्हाळा म्हटला की कैरीचे पन्हे आलेच. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कैरीच्या पन्ह्याचा स्वाद हा आंबट गोड असतो. लहान मुलांना कैरी, तसेच कैरीपासून बनवलेल्या पन्ह्याची चव जास्तच आवडते.

कोकम सरबत

उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात प्यायले जाणारे पेय म्हणजे कोकम सरबत. कोकम हे वात व पित्तनाशक फळ आहे. तसेच भूक वाढवणे, अन्नाची रुची वाढवणे हे गुण देखील कोकममध्ये आहेत. कोकम सरबत पचनासंबंधी व्याधी,अतिसार यात अत्यंत उपयुक्त ठरते.

बेलाचा रस

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ऊर्जावान राहण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे कोलेस्टेरॉल आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
हे ही जाणून घ्या

तुम्हाला माहीत आहे का?

मानवी शरीरात उष्णतेच्या वाढीमुळे उष्मा पेटके, उष्णता थकवा, उष्माघात आणि हायपरथर्मिया होऊ शकते.
वातानुकूलित ठिकाणी वेळ घालवल्याने उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो.
हलके, हलक्या रंगाचे कपडे शरीराचे सामान्य तापमान राखण्यासाठी उष्णता आणि सूर्यप्रकाश परावर्तित करण्यात मदत करू शकतात.


शरीरातील मीठ आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे उष्णतेच्या क्रॅम्प्सची शक्यता असते.
तुम्ही उन्हाळ्यात सगळ्यात जास्त कुठले पेय पितात ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमचा हा महितीपुर्वक लेख तुमच्या मित्र परिवार ग्रूप्स मध्ये नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *