मागे वळून पाहाताना…..!
बघता बघता 2024 या वर्षातला शेवटचा महिना आला. हा डिसेंबर महिनाही हां हां संपेल पण. डिसेंबरमध्ये खूप जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आहेत. आमच्या आई- अण्णांच्या लग्नाचा वाढदिवसही डिसेंबरातच होता आणि अण्णांचा वाढदिवसही डिसेंबर मधेच असायचा.माझ्या यजमानांचा वाढदिवसही 17 डिसेंबर आणि 12 वर्षांपूर्वी हे आम्हाला सोडून गेले तो दिवसही 1 डिसेंबर… !
आई-अण्णांना जाऊन इतकी वर्षं झाली.पण अजूनही
त्यांची आठवण झाली की घशाशी आवंढा दाटून येतो.
आणि मग असं वाटतं की,
अपू अशू देखील माझी अशीच आठवण काढतील…!
आणि त्यांच्या बाबांच्या सोबत घालवलेले कितीतरी क्षण त्यांच्या मनाच्या कुपीत साठवलेले आहेत त्यांनी.
पण कसं असतं सांगू..?
आपले आईवडील असेपर्यंत
त्या क्षणांचं मोल तितकं जाणवत नाही, जितकं ते गेल्यानंतर
जाणवतं.
अर्थात कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत हे म्हणता येईल. आपली जवळची व्यक्ती जोपर्यंत आपल्या सोबत असते,तोपर्यंत
आपण तिला गृहितच धरतो. ‘ही
काय आहेच माझ्यासाठी सदैव! ‘
अशाच भ्रमात असतो आपण.
‘कोणत्याही क्षणी काळ
आपल्यापासून आपल्या प्रिय
व्यक्तीला हिरावून घेऊ शकतो.
..अगदी क्षणाचीही उसंत न देता..!’ हा विचार आपण कधी फार खोलवर असा केलेलाच नसतो.त्या व्यक्ती शिवायचं जग आपल्या कल्पनेतही नसतं.
त्यामुळे खूप गोष्टी करायच्या,
सांगायच्या राहूनच जातात.
खास करून,आपलं आपल्या आईवडिलांवर किती प्रेम आहे..?त्यांना आपल्या मनात,आपल्या
आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे.. हे आपण कृतीतून किंवा शब्दांतून कधीच व्यक्त केलेलं नसतं.आपल्या लहानपणी आपल्याला तेवढी जाण नसते आणि मोठेपणी आपण आपल्या संसारात इतके रममाण झालेले
असतो..आपल्याच दुनियेत इतके मश्गूल असतो की त्यांचं अस्तित्व ,जणू काही आपण विसरूनच गेलेले असतो.
कदाचित त्यांच्या थिजलेल्या आयुष्यात त्यांना हीच खंत वाटत असेल,की आपली मुलं आपल्याला किती सहज विसरून गेली…?
खरं तर आपण त्यांना विसरलेले
नसतोच मुळी.फक्त आपल्या
priorities बदललेल्या असतात.आपल्या अगदी जवळच्या वर्तुळात,”आपली बायको-मुलं..आपली नोकरी..
आपली स्वप्नं आणि त्यांच्या पूर्तीसाठी करावे लागणारे प्रयत्न हेच फक्त असतं….!
आणि ज्याक्षणी ते या जगातून कायमचे निघून जातात,त्याक्षणी आपल्याला जाणवतं की तेही आपल्यासाठी खूप महत्वाचे…
खूप जवळचे होते… !
तेव्हा आपल्याला आठवतं ,
त्यांच्या भोवतीच फिरणारं आपलं बालपण…त्यांचं दिसणं…त्यांचं ‘असणं’ ,त्यांच्या लकबी..त्यांचा
आवाज..त्यांचे शब्द..त्यांनी आपल्यावर केलेलं प्रेम… आपल्यासाठी केलेला त्याग… आपल्यावर जीवापाड केलेली माया.. आपल्या पाठीवर त्यांनी दिलेली शाबासकीची थाप… त्यांचं सदैव आपल्या पाठीशी उभं राहाणं..”आपल्यासाठीच” असणं
सारं सारं आपल्याला आठवतं. अगदी त्यातल्या बारीकसारीक
तपशिलांसकट..!
मग आपण ते आपल्या मुलांना पण आवर्जून सांगतो..त्यांच्या
आठवणींनी अश्रू ढाळतो….!
....पण आपल्या जगातून नाहीशा झालेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना,ते सगळं कळतं तरी की नाही कुणास ठाऊक?
मृत्यूनंतर कुठे जातात ते..?कसं असतं त्यांचं नवं जग..?त्यांना आपले विचार कळतात का.. ?आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात तरी का?
आपल्याला त्यांची आठवण येते म्हणून ते सुखावतात.. ? की या सा-याच्या पलिकडे असलेल्या खूप खूप दूरच्या जगात हरवून गेलेले असतात ते ?
आमची, आता सत्तरीत असलेली पिढी तर आता स्वतःच्या आई- वडिलांसंदर्भात घडलेल्या चुका सुधारू शकत नाही…आता त्याला खूपच उशीर होऊन गेला.
पण, हा विचार.. ही खंत
आपल्याला कधीही वाटू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही
सर्वांनी;ज्यांच्या शिरावर अजूनही आई- वडिलांचं छत्र आहे..ज्यांना ते भाग्य अजूनही लाभलेलं आहे; त्यांनी, एक गोष्ट कायम लक्षात
ठेवावी.
तुमचं त्यांच्यावरचं प्रेम त्यांना कळूद्या…तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा…!
तुमचं आयुष्य भरभरून जगतानाही अधूनमधून मागे वळून पाहात जा..
आपल्या आईवडीलांचे थरथरणारे हात दिसूदेत तुम्हाला..त्यांची कृश झालेली काया..त्यांची अधू झालेली दृष्टी… येऊद्यात तुमच्या लक्षात…त्यांच्या मनाला ग्रासणारी एकटेपणाची भीती जाणवूदेत तुम्हाला….!
आता या वयात,तुमच्या मायेचे,
तुमच्या एखाद्या प्रेमाच्या शब्दाचेच भुकेले आहेत ते… तुमचा थोडासा वेळ हवाय त्यांना..तुमचा प्रेमाचा स्पर्श हवाय…! तुमच्या हातांच्या हलक्याशा मिठीसाठी आसुसलेले आहेत ते…बस्…!
तेवढं द्या त्यांना.
म्हणजे ते जेव्हा या जगाचा निरोप घेतील तेव्हा अगदी तृप्त ,शांत असतील. ..आणि ते नसताना जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल..जेव्हा तुम्हाला त्यांची आठवण येईल ती सदैव आनंदाने..कृतार्थ भावनेने येईल.
त्यामागे कुठलीही रुखरुख किंवा अपराधीपणाची भावना
असणार नाही…. !!
“Start Your Website Journey Today – Exclusive Hostinger Discounts!”






