केकी मूस : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर 50 वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार
चाळीसगावासारख्या ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष प्रेयसीची वाट पाहत, घराचा उंबरठा न ओलांडणारा केकी मूस हा विश्वविख्यात छायाचित्रकार. ज्यानं तीनशेहून अधिक सुवर्णपदकं मिळवली.
आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून जन्म दिला. या थोर कलामहर्षीनं जवळपास पाच दशकं विजनवासात घालवली.
रोज मध्यरात्री येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांकडं डोळे लावून बसलेला हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या स्वागतासाठी रोजच तयारी करत असे.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यानं स्वतःला कला आणि प्रेमाला वाहून घेतलं अशा केकी मूस यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
50 वर्ष पाहिली प्रेयसीची वाट
एखादी दंतकथा वाटावी अशीच केकींची ही प्रेमकथा. प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास 50 वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा हा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वे गाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नसत.
खान्देशातील कलामहर्षी केकी मूस या महान कलाकारानं प्रेमात चाळीसगावमध्ये ‘मूस आर्ट गॅलरी’ निर्माण केली. कलामहर्षी केकी मूस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत हे त्यांच्या शालेय जीवनात केकी मूस यांना पहिल्यांदा चाळीसगावमध्येच भेटले होते.
केकी ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी त्यांना मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर निरोप द्यायला आली होती.
तेव्हा तिनं केकी मूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की, एक दिवस ती नक्की पंजाब मेलनं चाळीसगावला येईन आणि त्यांच्या सोबत जेवण करेन.
त्यामुळे प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास असलेले केकी मूस दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं-खिडक्या रेल्वेगाडी येण्याच्या वेळेला उघडत असत. दिवे लावत असत. दररोज बागेतल्या ताज्या फुलांचा एक गुच्छ ते स्वतः तयार करून ठेवत असत.
नंतर जेव्हा त्यांच्या बागेतील फुलं कमी झाली तेव्हा त्यांनी शोभेच्या कागदी फुलांचा एक गुच्छ कायमचाच तयार करून ठेवला होता.
तसेच रोज रात्री दोन व्यक्तींच्या जेवनाची तयारीसुद्धा ते करून ठेवत असत. अशाप्रकारे त्यांच्या प्रेयसीच्या स्वागताची ते रोज तयारी करून ठेवत.
कलामहर्षी केकी मुस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत म्हणतात, “त्यांनी प्रेयसीला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला. दररोज पंजाबमेल रेल्वे गाडी गेल्यानंतरच ते जेवायचे. 31 डिसेंबर 1989 या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं होतं.”
सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकी गेल्यानंतर त्यांना दोन पत्रं सापडली. त्यातलं एक पत्र त्यांच्या प्रेयसीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरं केकींच्या एक नातलग हाथीखानवाला यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हाथीखानवाला यांनी त्या पत्रात केकींसांठी लिहिलं होतं की त्यांच्या प्रेयसीला लंडनला पाठवण्यात आलं आहे आणि तिकडं तिचं लग्नही करण्यात आलं आहे. मात्र, ते पत्र केकींनी कधीच वाचलं नसल्याचा खुलासा सामंत यांनी केला आहे.
‘ती’ कोण होती?
मुंबईत शिक्षण घेत असताना केकींची निलोफर मोदी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. नंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
सगळं शिक्षण पुर्ण करून केकी मूस यांनी चाळीसगाव येथे आपल्या आईवडील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आणि निलोफरच्या नात्यात कायमचा दुरावा आला.
कारण केकींच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असली तरी त्यांच्या तुलेनेत निलोफर या श्रीमंत कुटुंबातील होत्या.
त्यामुळे निलोफर यांचे आईवडील या नात्याबाबात फार खुश नव्हते, तरीही त्यांनी लग्नाला होकार दिला होता.
परंतु, निलोफर यांच्या आईवडीलांना त्यांचं मुंबईसोडून चाळीसगावसारख्या ठिकाणी राहायला जाणं मान्य नव्हतं.
निलोफर यांची केकींसोबत चाळीसगावला जाण्याची तयारी असूनही त्यांच्या आईवडीलांनी निलोफर यांनी जाण्याची परवानगी दिली नाही.
परंतु केकी मुंबईवरून चाळीसगावला निघाले असताना निलोफरनं त्यांना एकदिवस चाळीसगावला भेटायला येण्याचं वचन दिलं.
नंतर त्या एका वचनाला केकींना स्वतःचं संपूर्ण आयुष्य वाहीलं.
50 वर्षांत फक्त दोनदाच घराबाहेर पडले केकी
केकी 50 वर्षात फक्त दोनच वेळा घराबाहेर पडले. याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा करताना कमलाकर सामंत यांनी म्हटलंय, “केकींनी 50 वर्षांचा बंदिवास स्वतः स्वीकारला होता.
1939 पासून ते 1989 या 50 वर्षांच्या काळात ते फक्त दोनदाच घराबाहेर पडले होते. एकदा 1957 ला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते औरंगाबादला गेले होते.
तर दुसऱ्यांदा भूदान चळवळीदरम्यान विनोबा भावेंचं व्यक्तीचित्र घेण्यासाठी 1970 दरम्यान ते चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटींग रूममध्ये गेले होते. खरंतर विनोबा भावेंचें भाऊ शिवाजी नरहर भावे हे केकींचे खास मित्र होते. त्यामुळे शिवाजीरावांच्या आग्रहाखातर ते घराबाहेर पडले होते.”
केकी मूस यांचं घर
“भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केकींना चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर भेटायला बोलवलं होतं. तेव्हा त्यांच्या आमंत्रणासही त्यांनी नम्रपणे नकार दिला होता.
शिवाय त्यांनाच निरोप पाठवला होता की तुम्हाला जर माझ्या हातून व्यक्ती चित्र तयार करून हवं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. तेव्हा स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू केकींना भेटायला त्यांच्या घरी आले होते.” असंही सामंत पुढे म्हणाले.
केकी जरी घराबाहेर पडत नसले तरी अनेक दिग्गज मंडळी केकींना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या घरी येत असत.
यामध्ये जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, महर्षी धोडो केशव कर्वे, वसंत देसाई, पंडित महादेवशास्त्री जोशी, श्री. म. माटे, बालगंधर्व अशा अनेक लोकांचा समावेश आहे. यातील बहुतेक व्यक्तींचे केकींनी काढलेले छायाचित्र त्यांच्या संग्रहालयात आहे.
कलेच्या प्रेमात असलेला अवलिया
केकी मूस हे छायाचित्रकार म्हणून तर जगप्रसिद्ध होते. ते चित्रकार, संगीतप्रेमी, संगीतसंग्राहक, उत्तम शिल्पकार, काष्ठशिल्पकार आणि ओरिगामिस्ट होते. (ओरिगामी म्हणजे कागदांना विविध प्रकारच्या घड्या घालून वेगवेगळ्या आकारांत घडविणे).
याशिवाय केकी उत्तम लेखक, अनुवादक, भाषांतरकार आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी सर्व धर्मातील ग्रंथाचा अभ्यास केला होता. ते पंडीत फिरोजा फरोन्जी, प्रो. नसीर खान आणि उस्ताद दिन महम्मद खान यांच्याकडे सतार वादन शिकले होते.
त्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराती, उर्दू आणि मराठी या भाषा येत होत्या. पुस्तकं गोळा करून स्वत:चं ग्रंथालय बनवण्याच्या उद्देशानं त्यांनी सुमारे 4000 पुस्तके गोळा केली होती. ते उर्दू कवितेचे मोठे चाहते होते.
इतर कलाकारांच्या कलाकृती, लाकूड कोरीव काम, पुतळे व पुरातन वस्तू, दुर्मिळ जुनी भांडी, खेळणी, जुनं फर्निचर, नाणी यांचा संग्रह त्यांनी केला होता.
केकींना विविध प्रकारच्या संगीताच्या कॅसेट आणि ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संग्रह करून ठेवण्याचा छंद होता. त्यांच्याकडं हिंदी, मराठी, गुजराथी, राजस्थानी गीतं तसंच बालगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, भजनं, अभंग, गझल, कव्वाली, कजरी, ठुमरी,रागदारी अशा विविध प्रकारच्या संगीताचा संग्रह होता.
त्यांचे फेक्ड फोटोग्राफी, स्थिर चित्रण, पोर्ट्रेट्स, अॅनिमल स्टडीज, व्यंगचित्रात्मक फोटोग्राफी यासारखे छायाचित्रण प्रकार सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांची विच, बेगर विदाऊट, शिव पार्वती, विंटर, तृषार्त, वात्सल्य ही छायाचित्रं विशेष गाजली.
टेबल-टॉप फोटोग्राफीमुळे मिळाली प्रसिद्धी
टेबल-टॉप फोटोग्राफीमुळे ते प्रसिद्ध झाले. टेबलटॉप फोटोग्राफीतील भारतातले पहिले महान कलाकार जे. एन. उनवाला यांच्याकडून केकींनी टेबलटॉप फोटोग्राफी देखील शिकून घेतली होती.
यामध्ये वस्तूंची कल्पक मांडणी करुन त्यांचा योग्य उंचीवरून काढलेल्या तसंच सावल्यांवर विशेष भर असणार्या छायाचित्राला टेबलटॉप फोटो म्हणतात.
टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून काढलेलं छायाचित्र जिवंत असल्याचा भास होतो. या टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणार्या चीजवस्तू त्यांनी घरातच जमवल्या होत्या.
त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगावच्या केकी मूस कलादालनात आहेत. जवळजवळ त्यांच्या 1500 कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे.
त्यावेळी केकींच्या ‘द वीच ऑफ चाळीसगाव’ या फोटोला ‘बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचं’ गोल्ड मेडल मिळालं होतं.
याबाबत केकी मूस यांच्यावर संशोधन करून लेखमाला लिहिलेल्या अॅड. क्रांती आठवले-पाटणकर सांगतात, “एक किस्सा असा आहे की फोटो पाठविण्याची मुदत संपत आली तरीही मनाजोगं मॉडेल केकींना मिळेना. त्यांनी देवाकडं प्रार्थना केली की एक मॉडेल पाठवून दे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केकी त्यांच्या घराच्या व्हरांड्यात केस पुसत होते. तेथून जाणाऱ्या एक आजी त्यांना पाहून ते वैद्य असल्याचं समजून त्यांच्याकडं औषध मागायला घरात शिरली.
केकींना हवं असलेलं मॉडेल त्यांना गवसलं आहे हे त्या आजीला पाहून केकींच्या पटकन लक्षात आलं. केकींनी तिच्या 4 आण्याच्या मोळीचे तिला 5 रुपये दिले आणि फोटो काढण्यासाठी तयार केलं.
गच्चीवर नेऊन तिचे जवळजवळ 40 फोटोग्राफ घेतले आणि नंतर आपल्या डार्करूममध्ये अखंड 24 तास त्यावर काम करून त्यातील एक फोटो स्पर्धेसाठी पाठवला. या फोटोला त्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं.”
केकींच्या टेबल-टॉप फोटोग्राफीनं तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परितोषिके मिळवली.
केकी चाळीसगावला पोहोचले कसे?
केकींचं पूर्ण नाव कैखुसरो माणेकजी मूस. मात्र त्यांची आई त्यांना ‘केकी’ म्हणायची. नंतर हेच नाव त्यांची ओळख बनलं. त्यांना बाबूजीदेखील म्हटलं जायचं. चाळीसगाव स्थानकाजवळ एक दगडी बंगल्यात ते राहायचे.
मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत 2 ऑक्टोबर 1912 मध्ये एका पारशी कुटुंबात पिरोजा आणि माणेकजी फ्रामजी मूस या आईवडीलांच्या पोटी केकींचा जन्म झाला.
आर. सी. नरिमन हे त्यांचे मामा मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. तत्कालीन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनीच बांधलेली वास्तू आहे.
तर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. खरंतर वयाच्या नवव्या वर्षांपासून चित्र काढणाऱ्या केकींना कलाकार व्हायचं होते.
परंतु माणेकजींना वाटे की केकींनी त्यांची सोडा वॉटर फॅक्टरी व दारूचं दुकान सांभाळावं. दरम्यान 1934-35 च्या सुमारास माणेकजींचं निधन झाल्यावर पिरोजाजींनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली.
आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नासाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली. केकींनी 1935 मध्ये लंडनमधील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला.
याच अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा विषय देखील होता. 1937 साली केकींनी त्याचाही अभ्यास केला. नंतर ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट ऑफ ग्रेट ब्रिटन’ या संस्थेनं त्यांना मानद सभासदत्व दिलं.
केकी मूस फऊंडेशनतर्फे केकींच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 31 डिसेंबरला कलामहर्षी केकी मूस कलादालनाच्या आवारात कार्यक्रम आयोजित केला जातो.
त्यानंतर केकी अमेरिका, जपान, रशिया, स्वित्झर्लंडला गेले. तिथं फोटोग्राफीची अनेक प्रदर्शनं पाहिली. अनेक कलाकारांना भेटले आणि 1938 साली भारतात परत आले.
त्यानंतर ते मुंबईवरून सरळ चाळीसगावमध्ये आले आणि त्यानंतर जवळपास पन्नास वर्षें त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेतलं.
रेम्ब्राँ हा डच चित्रकार केकींचं प्रेरणास्थान होता. रेम्ब्राँ या चित्रकाराचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बंगल्याचे ‘आशीर्वाद’ हे नाव बदलून ‘रेम्ब्राँज रिट्रीट’ असं ठेवलं.
आयुष्यभर प्रेयसीची वाट बघत कलेमधे स्वतःला वाहून घेतलेल्या या महान कलाकारानं 31 डिसेंबर 1989 ला सकाळी 11.00 च्या सुमारास त्याच घरातून जगाचा निरोप घेतला.
दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांनी 1983 ला केकी आणि त्यांच्या छायाचित्रणावरील ‘केकी मूस – लाइफ अँड स्टिल लाईफ’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
‘व्हेन आय शेड माय टीअर्स’ हे केकींनी स्वतः लिहिलेलं स्वतःचं आत्मचरित्र अजून प्रकाशित झालं नसल्याची माहिती कमलाकर सामंत यांनी बीबीसी मराठीला दिली.
तसेच केकी मूस फऊंडेशनतर्फे केकींच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 31 डिसेंबरला कलामहर्षी केकी मूस कलादालनाच्या आवारात कार्यक्रम आयोजित केला जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.