परदेशी नोकरी करणाऱ्या मुलाचा व्हॅाट्सॲप मेसेज :
‘प्रिय बाबा,
आज आम्ही दोघेही बाहेर जेवणार आहोत. त्यासाठी ह्या हॅाटेलात मी आम्हा दोघांसाठी टेबल बुक करुन ठेवलं आहे. मला इथं येऊन अर्धा तास झाला आहे तरी अजूनही सुनीता आलेली नाही. बहुतेक तिला ॲाफिसमध्ये अचानक काम लागलं असेल. मला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला मेसेज लिहित बसलोय…
बाबा, दरवर्षी आम्हाला ह्या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का? की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?
तुम्ही दरवर्षी गौरी गणपतीला, गौरीला नेसवायला दोन भारी साड्या घेऊन यायचे. आई त्याच साड्या पुढे वर्षभर वापरत असे. त्या साड्या आणल्यावर आई त्यावरुन हात फिरवत म्हणायची, ‘साडीचा पोत किती छान आहे, रंग किती खुलून दिसतोय.’ हीच तिची ‘थॅन्क्यू’ची भाषा होती का? की यातून ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ सुचीत करीत होती जे तुमच्यापर्यंत सहज पोहचत होते?
तुम्ही कधी आईसाठी ‘गिफ्ट’ आणल्याचं मला आठवत नाही. मात्र दरवर्षी अक्षय्य तृतीयेला जमेल तशी सोन्याची वेढणी न चुकता आणत होतात. खरंच ती मुहूर्ताची खरेदी होती की एक प्रकारची गुंतवणूक की आईवरील तुमचं ‘प्रेम’ हे मला कधीच कळलं नाही…
बाबा, मला सांगा..तुमच्या भावना न बोलताच आईला कशा कळायच्या? आज सुनीता, मला एक छानसा शर्ट भेट देणार आहे. तुम्हाला कधी आईनं भेट दिल्याचं मला आठवत नाही. मात्र गरम गरम पुरणपोळ्या खाऊन झाल्यावर तुम्हाला आलेला तृप्तीचा ढेकर, हीच तिच्याकडून छान भेट मिळाल्याची पोचपावती असायची का?
काहीच न बोलता, ‘स्पेशल’ काहीच न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात? की काही अपेक्षाच नव्हत्या कधी तुम्हाला एकमेकांकडून. की फक्त बघूनच सारं कळत होतं? बरोबर राहूनच न बोलता सर्व उमजत होतं?
बाबा, मला इथं येऊन एक तास होऊन गेला. अजूनही सुनीता आली नाही. तिची वाट पाहून मी देखील कंटाळून गेलो आहे. ॲाफिसच्या कामातून तिला बाहेर पडायला जमत नसावं, असं दिसतंय.
आज आमच्याकडे प्रेम आहे, पैसा आहे, मात्र वेळच नाहीये, ते प्रेम व्यक्त करायला…त्यामानानं तुम्ही खरंच भाग्यवान होता… आयुष्यभर आईवर अव्यक्त प्रेम करीत राहिलात आणि ती देखील तुम्हाला सावलीसारखी साथ देत राहिली…
बाबा, मी आता आटोपतं घेतो. मेसेज खूपच मोठा झालाय. वेळ आहे ना, तुम्हाला वाचायला?
तुमचाच,
अजय
मी मोबाईल बाजूला ठेवला व भाजी आणायला गेलेल्या हिची वाट पाहत बसलो. खरंच आम्ही आमच्या सहजीवनात कोणतेही 'डे' साजरे केले नाहीत, नव्हे तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही...
“Start Your Website Journey Today – Exclusive Hostinger Discounts!”






