December 22, 2024

जागतिक रंगभूमी दिन

World Theatre Day : आज जागतिक रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्त हा दिवस का साजरा केला जातो आणि रंगभूमीचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात…


आज जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day) आहे. सर्वत्र उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. पण तुम्हाला माहित आहे का की या सगळ्याची सुरूवात कधी झाली? आजपासून बरोबर 61 वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली खरी पण पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. तेव्हापासून हा उपक्रम सुरूच आहे. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू (Joe Cochchu) यांनी पहिल्यांदा हा संदेश देण्याचा पहिला मान मिळवला होता. तर 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांना ही संधी मिळाली होती.


भारतीय रंगभूमी

भारतातील रंगभूमीचा इतिहास खूप जुना मानला जातो.असं मानलं जातं की नाट्यकलेचा पहिला विकास भारतातच झाला. ऋग्वेदातील काही सूत्रांमध्ये यम आणि यमी, पुरुरवा आणि उर्वशी इत्यादींचे काही संवाद आहेत.हे संवाद वाचल्यावर इथूनच नाटकाची सुरुवात झाली असावी, असं अनेक अभ्यासक सांगतात.

मराठी रंगभूमी

नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला
माध्यमातील सर्व सामाजिक घटक आणि देश एकत्र यावेत व त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव दिनांक २७ मार्च १९६१ रोजी “थिएटर ऑफ नेशन” या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. थिएटर ऑफ नेशन अर्थात राष्ट्रीय रंगमंच स्थापन करण्यामागील काही महत्त्वाचे मुद्दे या संकल्पनेद्वारा जगासमोर ठेवले गेले. मानवजातीचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नाट्यकलेचा नाट्याविष्कार, हे सशक्त माध्यम मानले गेले आहे. या माध्यमाचा वापर वैदिक काळापासून ते आजच्या प्रस्थापित रंगभूमीपर्यंत जागतिक पातळीवर विविध अंगाने झाला आहे. त्यामुळे नाटक हे माध्यम सर्वव्यापी व्हावे, या उद्देशाने थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेची अंमलबजावणी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (International Theatre Institute) या संस्थेने केली.


नाट्यकलेची सर्वव्यापी सैद्धांतिक व्याख्या, नाटकाचे दृश्यात्मक सामर्थ्य, नाट्यकलेसमोरील आव्हाने, नाट्याभ्यास व संशोधन आणि नाट्यकर्मींची कर्तव्ये या मुद्द्यांवरील विस्तृत चर्चा या संकल्पनेद्वारा मांडण्यात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट यशस्वी झाली. २७ मार्च १९६१ ते २७ मार्च १९६२ या कालावधीत एकूण ८५ देशांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे २७ मार्च १९६२ पासून युनेस्कोने हाच दिवस “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला. आजमितीला थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेशी जगातील ९० देश जोडले गेले आहेत.

जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी या व्यासपीठावरून पुढे आर्थर मिलर, हेराॅल्ड पिंटर यांसारख्या जगविख्यात नाटककार-रंगकर्मींनी नाटकाविषयीचे आपले चिंतन मांडले. शेक्सपिअरने ‘जग ही एक रंगभूमी आहे’ असे म्हटलेले आहे; परंतु रंगभूमीवरून जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेने दिला. नाटकाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकास नाट्यसृष्टी आतून व बाहेरून पाहता येते. त्यामुळे नाट्याविष्काराचा प्रत्येक क्षण सजीव असतो व नाटक या प्रक्रियेत तो क्षण नव्याने जन्म घेत असतो, असे यावरील अभ्यासकांचे तात्त्विक चिंतन आहे.

नाट्यशास्त्राच्या अनुषंगाने वाचिक, आंगिक, आहार्य व सात्विक असे चार अभिनय प्रकार मांडले गेले आहेत. मात्र मागील २५ वर्षांच्या काळात विकसित झालेल्या मंचीय विचारांमुळे “तात्त्विक” हा नवा अभिनयप्रकार रुजण्यास थिएटर ऑफ नेशन या चळवळीने योगदान दिले. जागतिक पातळीवर सैद्धांतिक दृष्ट्या “तात्त्विकतेचे” विश्लेषण व विवेचनाचे काम नाट्यकर्मींद्वारा सुरू आहे. २७ मार्च १९६२ रोजी जागतिक पातळीवर नाट्यविचारांचा प्रवाह एकत्रितपणे सुरू झाल्याकारणाने हा दिवस “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून साजरा केला जातो.
तुम्ही देखील नाटक बघताच असाल ; मनोरंजन आणि आपले खूप घट्ट नाते आहे त्या साठी मराठी नाटक रंगभूमीवर भरभरून प्रेम करा. आणि तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *